मुबई : वृत्तसंस्था
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ते अटकेत आहेत.
पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. ईडीच्या आरोपानुसार, गोरेगावातल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊतांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. पुनर्विकासासाठी ही जागा राऊतांच्या कंपनीला दिली होती. मात्र त्याचा काहीच पुनर्विकास झाला नाही, उलट या जागी बांधलेली घरं काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून राऊतांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये जमावले.
त्यानंतर हे पैसे प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते केले. यातले ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप केलाय.