जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 15 जुलै रोजी “आशाढस्य प्रथम दिवसें” म्हणजेच महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भैय्यासाहेब गंधे सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप,पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे,सौ. रमा तारे,संस्कृत विभाग प्रमुखा सौ.पद्मजा जोशी यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन संस्कृत मंडळाची स्थापना करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .संगीता पानट यांनी केले.खुशी रिल या विद्यार्थिनींने श्रीहरीस्तोत्रम् हे नृत्य सादर केले.यावेळेस काही विद्यार्थांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्याची तसेच त्यांच्या कार्याची माहिती मराठी व संस्कृतमध्ये सादर केली.तसेच “सरसर आयंती वर्षधारा” व “कालिदास गीत” सादर केले.महाकवी कालिदास यांच्या जीवनावरील नाटीकेचे संस्कृत विवेचन ज्येष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी यांनी सादर केले.याचे मराठीत रूपांतर कुमारी लावण्या महाले, टिशा नेहेते , विनय पाटील,प्रज्वल साळुंखे,उदय भालेराव,योगेश्वरी धनगर, कृष्णा तांबट,गिरीश भारुळे,पार्थ घुगे यांनी विविध वेशभूषेसह नाटिका उत्तमपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे उप मुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप यांनी संस्कृत भाषेचे महत्व सांगून विद्यार्थांनी संस्कृत भाषा अवगत करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अक्षरा व गुंजन यांनी तर आभार प्रदर्शन संस्कृत शिक्षिका सौ.माधवी बडगुजर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कृत विभाग व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




















