जळगाव मिरर | २७ जुलै २०२६
आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरेश सुरळकर यांनी मातोश्री बेबीबाई सुरेश सुरळकर यांच्या प्रेरणेतून रविवारी, २६ जुलै रोजी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमात तब्बल ५०० मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम जैन इरिगेशन सिस्टीम, अण्णासाहेब सागरमल सांखला सोसायटी, रोहित कन्स्ट्रक्शन, नंदिनी ट्रेडिंग कंपनी आणि तरुण कुढापा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे, मनपाचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, अण्णासाहेब साखला पतसंस्थेचे चेअरमन सुभाषजी सांखला, जैन इरिगेशनचे अधिकारी अनिल जोशी, डॉ. निलेश चांडक, सामाजिक कार्यकर्ते शोएब खाटीक, राजकुमार वाणी, मातोश्री बेबीबाई सुरळकर, मुन्ना परदेशी, राजेंद्र पाटील, सरला चौधरी, संगीता सूर्यवंशी, निर्मला चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष चौधरी, अलका सोनवणे आणि निलेश देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक करताना प्रशांत सुरळकर यांनी, समाजातील गरजू घटकांना मदत करणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
तुमच्यातील शिकण्याची आवड आणि जिद्दच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. ज्ञानाची ज्योत पेटत राहो आणि अभ्यासाची कवाडे उघडत राहो… तुमच्या प्रत्येक पावलाला यशाची साथ मिळो,” अशा शब्दांत उपमहापौर मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही परिस्थिती यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. हे शालेय साहित्य तुमच्या अभ्यासाच्या प्रवासात नवीन ऊर्जा आणि दिशा देईल, असा विश्वास शरद तायडे (महानगर प्रमुख व नगरसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे यांनी केले. यासोबतच पर्यावरणाचे भान ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. निलेश चांडक व माजी अधीक्षक राजकुमार वाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रोहिणी सुरळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना मराठे, भैय्या ठाकूर, अनिल ठाकूर, सुभाष जंगले, प्रकाश चौधरी, राहुल चौधरी, योगेश पाटील, दीपक ठाकूर, कल्पेश बनवे, यश चौधरी, नारायण कोळी, चंद्रकांत सोनवणे, रवींद्र लुले, निलेश पाटील, हितेश वाणी, कन्हैया चौधरी, निलेश कोळी, संदीप चौधरी, भूषण चौधरी, सचिन भावसार, वैभव सूर्यवंशीसंदीप भावसार, पंकज भावसार, पवन भावसार, सचिन चौधरी, शंभू भावसार आदींनी विशेष परिश्रम घेतले.





















