जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील शिक्षिकेला लग्नाचे अमिष दाखवून प्रशांत सूर्यभान झाल्टे या शिक्षकाने गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी शिक्षिकेवर अत्याचार केला. हा प्रकार सन २०२१ पासून सुरू होता. शिक्षकाने लग्नास नकार दिल्याने शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दि. १३ सप्टेंबर रोजी शिक्षकाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेसोबत प्रशांत झाल्टे याने सहानुभुती दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच तू मला आवडते असे सांगून तीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. शिक्षिकेने त्याला लग्नाविषयी विचारले असता तो नकार देऊ लागला. त्यानंतर सदर शिक्षिका त्याच्या घरी गेली असता त्याने नकार कायम ठेवला. त्या वेळी त्याच्या आईने शिक्षिकेला सांगितले की, त्याचे लग्न झालेले आहे, तुला या घरात यायचे असल्यास त्याच्या लहान भावाशी लग्न करावे लागेल असे सांगितले, मात्र त्या महिलेने नकार दिला.
अखेर या प्रकरणी शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षक प्रशांत झाल्टे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या आईविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.