जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नागपूर शहरात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या मोहात चुलत भावांना दोन लाख रुपयांमध्ये सुपारी देत सासूचा खून केल्याची घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैत्री नगरात घडली. यापूर्वी याच परिसरात घडलेल्या पुट्टेवार हत्याकांडाची या निमित्ताने उजळणी झाली. अजनी पोलिसांनी या खुनाचे रहस्य दहा दिवसानंतर शोधून काढले. सुनीता ओंकार राऊत (वय 54 वर्ष) राहणार मित्र नगर असे मृत महिलेचे तर वैशाली अखिलेश राऊत (वय 30), रितेश प्रकाश हिवसे (वय 27) आणि श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (21) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यांचे भाऊ सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊराव मेंढे (वय 57 वर्षे) राहणार शिवाजीनगर हुडकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सुनिता या सून वैशाली अखिलेश राऊत व वैशालीची मुलगी रिद्धीका उर्फ मिस्टी (वय 5 वर्षे) यांच्यासह मित्र नगर येथे राहत होती. सुनीतांचे पती ओंकार यांचे 2016 मध्ये निधन झाले. 2023 मध्ये अखिलेशचा मृत्यू झाला.
28 ऑगस्टला सुनीताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शेजाऱ्यांनी भगवान यांना दिली. भगवान घरी गेले त्यावेळी सुनीता पलंगावर निपचित पडलेल्या होत्या. आईला बीपीचा त्रास असल्याने हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असे वैशालीने खोटेनाटे भगवान यांना सांगितले. याच दिवशी रात्री नऊ वाजता माणेवाडा घाट येथे सुनिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वडिलांना चिकनगुनिया झाल्याचे सांगून वैशालीने 27 ऑगस्टला उपचारासाठी शेजारी असलेल्या अरुणा चव्हाण यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले व ही रक्कम तिने ऑनलाईन भाडेकरुच्या खात्यात जमा करायला लावली. भाडेकरू सीता येलेकर यांनी ही रक्कम श्रीकांत हिवसे यांच्या खात्यात जमा केली. मात्र सुनिता यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वैशालीचे वडील हजर होते. ही बाब कळताच भगवान यांना संशय आला व त्यांनी चौकशीला सुरुवात केली. वैशालीच्या मोबाईलची तपासणी केली असता, ती सतत श्रीकांत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सुनिता वैशालीच्या चरित्रावर संशय घ्यायच्या या शिवाय संपत्तीवरूनही वाद व्हायचे अशी माहिती आहे. त्यामुळेच वैशालीने चुलत भावांना दोन लाख रुपये सुपारी देऊन ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.
27 ऑगस्टला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोघे वैशालीच्या घरी आले. त्यांनी मागील दाराने घरात घुसले व सुनिता यांची हत्या केली. सकाळी दोघेही पसार झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार करीत आहेत. यापूर्वी नागपुरात झालेल्या पुट्टेवार हत्याकांडाची या निमित्ताने उजळणी झाली. नगररचना विभागाची गडचिरोली येथे कार्यरत सहाय्यक संचालक अर्चना मनीष पट्टेवार यांनी सुपारी देऊन संपत्तीसाठी सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारखाली चिरडून हत्या केली होती.