जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२४
राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील अमरावती येथील माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नवनीत राणा यांना गँगरेपची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे म्हटले आहे.
पत्र पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्याने 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले. आरोपीने चिठ्ठीत आपला फोन नंबरही लिहिला आहे. पत्रात नवनीत राणा यांच्याबाबत आणखी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. तसेच त्यांचे पती रवी राणा यांच्याबद्दल अशोभनीय गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसात या विरोधात फिर्याद दिली आहे.

नवनीत राणा या एक चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. नवनीत यांनी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी भाषेतील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ज्यात त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19731 मतांनी पराभव केला.