जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच रत्नागिरी येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. परिचारिका म्हणून शिकत असलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रत्नागिरीत घडली. या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील संतप्त परिचारिकांनी काही काळ काम बंद केले. त्यापाठोपाठ असंख्य रत्नागिरीकर रस्त्यावर उतरले आणि जिल्हा रुग्णालयाबाहेर मुख्य रस्ता अडवण्यात आला. अखेर पोलिसांनी कारवाईची हमी दिल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गावी आपल्या घरी गेली. होती. सोमवारी सकाळी सात ते सव्वासात वाजेच्या सुमारास ती रत्नागिरीत आली. साळवी स्टॉप येथे ती एका रिक्षात बसली. तिला थोडे मळमळत असल्याने रिक्षाचालकाने तिला पाणी दिले. मात्र, त्यानंतर तिची शुद्ध गेली. तेथून पुढे काय झाले, हे आपल्याला आठवत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. शुद्ध आली, तेव्हा आपण चंपक मैदानानजीकच्या कचरा टाकल्या जाणाऱ्या भागात होतो, असे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) अन्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.