जळगाव मिरर | २७ जुलै २०२५
शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रविवारी दुपारी जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज दत्ता हिवराळे (वय २७) आणि कल्पेश वसंत चौधरी (वय २५) यांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात धीरज याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, कल्पेश चौधरी याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी ते समोरासमोर आल्याने वाद पुन्हा उफाळून आला आणि हाणामारीत परिवर्तित झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, धीरज हिवराळेच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रमंडळींनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. वातावरण भावनात्मक आणि आक्रोशमय झाले होते. या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





















