पाचोरा : प्रतिनिधी
गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्याची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधम आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका खेडेगावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतीमंद तरूणीवर गावातच राहणाऱ्या ज्योतीराम पांडूरंग पाटील (वय-२५) हा मागील चार ते पाच महिन्यांपासून मध्यरात्री पिडीतेची आई झोपलेली असतांना तिच्यावर अत्याचाराचा करत होता. दोन महिन्यापूर्वी पिडीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील यला दुष्कृत्य करतांना रंगेहात पकडले होते. याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर पोळ्याच्या आदल्या दिवशी पिडीत तरुणी व तिची आई या दोघेजण आजारी पडल्या होत्या. त्यानंतर पिडीता आजारी पडल्यामुळे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
यासंदर्भात पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचासमोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याला पिडीतेसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतू त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. अखेर पिडीत मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याच्या विरोधात ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक भरत काकडे हे करीत आहे.