जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटनांविरोधात जनआक्रोश आंदोलन सुरू असताना नुकतेच मालेगाव तालुक्यातील दुंधे जिल्हा परिषद शाळेतील ५६ वर्षीय शिक्षकाने दहा वर्षांच्या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ३० ऑगस्ट दुपारी शिक्षकास जाब विचारला असता त्याने कागदावर लिहून त्या कृत्याची कबुली देत निर्लज्जपणाचा कळस गाठला. या नराधमाचे नाव जिभाऊ खैरनार असे असून छातीत दुखत असल्याने त्याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकांच्या फिर्यादीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुंधे येथे पहिली ते चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. एका शिक्षकाला मुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याने तो महिन्यापूर्वीच दुसऱ्या शाळेत गेला होता. त्यामुळे खैरनार शाळेत एकटाच शिक्षक होता. तो गावातीलच रहिवासी असून चौथीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीची छेड काढत होता. यादरम्यान त्याने अत्याचार केल्याचा मुलीने आरोप केला आहे. मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. शिक्षणासाठी ती आपल्या मावशीकडे राहते. घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला जाब विचारला. यावेळी खैरनारने आपली चूक झाली असून जी शिक्षा मिळेल ती भोगण्यास तयार असल्याचे ग्रामस्थांसमोर कागदावर लिहून दिले.