जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झालेली असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या दिग्गज नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांनी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट टीका केली. त्यांनी त्यांचा उल्लेख ‘बाजारबुणगे’ म्हणून केला. या बाजारबुणग्यांची हा महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घेण्याची इच्छा आहे. पण त्यांना हा महाराष्ट्र विरांचा आहे हे माहिती नाही, असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या ठाकरे गटातील संभाव्य प्रवेशाविषयी चर्चा सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे वैजापूरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. दिनेश परदेशी यांची वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. आता त्यांची ही इच्छा ठाकरे गटातून पूर्ण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.
मी गेल्या आठवड्यात वैजापूरला येऊन गेलो. त्याचवेळी तुमची आमच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा होती. पण त्यावेळी तो प्रवेश झाला नाही. पण आता तुमचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही भाजपतून इकडे आलात. त्यामुळे माझा भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना प्रश्न आहे की, भाजपमध्ये ज्या पद्धतीने भेसळीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? सध्या हिंदुत्त्वाच्या नावाखाली जे थोतांड माजवण्यात येत आहे, ते हिंदुत्त्व माझे नाही, असे ते म्हणाले.