जळगाव मिरर । २ मे २०२३
जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नवजात शिशूंचे नेमके पालक कोण? हे ठरवण्यासाठी पालकांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. निरोप देण्यातील गोंधळामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा असून या प्रकरणी आता दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मोठा वादंग निर्माण झाला व पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नजरचूकीत नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार मंगळवारी २ मे सकाळी ११ वाजता रोजी घडला आहे. दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांमार्फत डीएनए टेस्टद्वारे हे शिशु आता खऱ्या मातांच्या स्वाधीन होणार आहेत. हा प्रकार परिचारिकांच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे घडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०) आणि प्रतिभा भिल (वय-२०) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती, झटके येत होते. त्यामुळे त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाकडून घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली. पण नवजात शिशु पालकांकडे सोपविताना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनिकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. काही वेळाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच समजत नसल्याने पालकांचा गोंधळ उडत होता.