
जळगाव मिरर | २२ मार्च २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना आता पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदननगर भागात पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आयटी अभियंता पतीने पोटच्या तीन वर्षांच्या मुलाचा अत्यंत निर्घूनपणे खून केल्याची घटना घडल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी उघडकीस आली. हिम्मत माधव टिकेटी (वय ३.५ वर्षे) असे मयत मुलाचे नाव आहे. तर माधव साधुरात टिकेटी (वय ३८, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे नराधम आरोपी पित्याचे नाव आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ही घटना २१ मार्च या दिवशी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी, विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी उघडकीस आली. आरोपी माधव टकेटी हा मूळचा विशाखापट्टण येथील असून तो २०१६ पासून पुण्यात स्थानिक आहे. तर त्याची पत्नी स्वरूपा माधव टिकेटी या गृहिणी आहेत. गुरुवारी २० मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास माधवने पत्नीला मुलगी शाळेतून आणि त्याच्यासोबत तीन वर्षांचा मुलगा शाळेत आणयला जाणार आहे, असे सांगितले होते.
मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नसल्याने तसेच त्याचा फोनही बंद लागत असल्याने त्यानंतर स्वरुपा यांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे याविषयी चौकशी केली. मात्र, त्या दोघांचाही कुठे थांगपत्ता लागला नाही. अखेर २१ मार्च रोजी रात्री उशिरा स्वरुपा यांनी चंदननगर पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दिल्यानंतर तपासाला सुरूवात केली. माधवची चौकशी करण्यात आली. या चौकशीत माधव याने दारू पिल्यानंतर हडपसर बस स्थानकावर असताना मुलगा हरवला असल्याचे पोलिसांंना सांगितले. त्याच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
पत्नीवर तो अनेक दिवसांपासून संशय घेत होता. त्या संशयातूनच त्याने आपल्या निष्पाप मुलाचा अत्यंत निर्घूणपणे खून केला. मुलाला निर्जनस्थळी नेत त्याची चाकूने गळा चिरून अत्यंत अमानुषमने हत्या केली. या घटनेमुळे मयत मुलाची आई स्वरुपा टिकेटी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.