जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच मुंबई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागात दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तेथे एका महिलेने तिच्या पोटच्या पोरीची, अवघ्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली. या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेतला. एवढंच नव्हे तर त्यानंतर तिने स्वतः देखील गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली असून आई-मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवीलमधील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाइल परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलीला ठार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. पूजा राहुल सपकाळ (वय 29) असे महिलेचे नाव आहे.
मयत पूजा हिने हॉलमध्ये तिच्या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने गळफास लावून घेत स्वतःचे जीवनही संपवलं. या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत महिला पूजा हिने असे कृत्य का केले , तिच्या घरात काही तणाव होता, तिचा पती यावेली कुठे होता, यामध्ये काही घातपात आहे का अशा सर्व बाजूंनी याप्रकरणाचा तपास करत आहेत. मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.