जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बटाईने दिलेल्या शेतात जनावरांपासून शेत पिकाचे संरक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या झटका मशिनचे तारांचे कुंपण केले आहे. या प्रवाही ताराच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने एका ३४ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांचे शेत गट क्रमांक ७२४/२ हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोळी (रा.संभाजी पेठ, यावल) यांनी बटाईने केले आहे. या शेतात असलेल्या पिकाचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी कोळी यांनी बॅटरीवर चालणारे झटका मशिनचे तारेच कुंपण केले आहे. शेताच्या सभोवताली लावलेल्या या तारांच्या कुंपणावर शुक्रवारी विशाल रमेश मेढे (वय ३४, रा.अडावद, ता. चोपडा) हा तरुण मृत स्थितीत आढळून आला. तेव्हा या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री पोलिस ठाण्यात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी सचिन कोळी यांच्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम तडवी तपास करीत आहेत.