जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ ।
गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वॉइन शॉपमध्ये बिअरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने शॉपमधील व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून ५ हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्या नगरातील चिराग विष्णू गारानी हे गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वाइन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती शॉपमध्ये आला. त्याने तीन बिअर आणि एका हाफ व्हिस्कीची मागणी केली. यावेळी आधी पैसे दे, असे व्यवस्थापक गारानी यांनी म्हटल्यावर दोघांमध्ये वाद सुरु होऊन गोंधळ झाला. यानंतर त्या व्यक्तीने पाठीमागून चाकू काढला ‘तू दारू दे तरच मी इथून जाईन’ अस् म्हणू लागला व गारानी यांना एटीएम स्वॅप मशीन फेकून मारले. नंतर त्याचा मित्र तेथे येऊन त्याला घेऊन गेला.
काही मिनिटांनी ती व्यक्ती पुन्हा वॉइन शॉपमध्ये आली व गारानी यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करू लागली. नंतर पाच हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन काऊंटरवरील दोन ते तीन बिअरच्या बाटल्या या गारानी यांना फेकून मारल्या. गारानी यांनी हा प्रकार मालकाला सांगितला. या गोंधळामुळे शॉपच्या आवारात चांगलीच गर्दी झाली होती. अखेर रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.