
विविध राज्यांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील भाविकांकडून दर्शन, पूजेसाठी गर्दी
जळगाव मिरर | ५ मे २०२६
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर मंगळवार, दि. 5 मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते यंदाच्या अर्थात 2026 या वर्षातील द्वितीय अंगारक योग असलेल्या संकष्ट चतुर्थीचे.
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हटले जाते. मंगळवार, दि. 5 मे रोजी यंदाच्या वर्षातील द्वितीय अंगारक संकष्ट चतुर्थी (वैशाख वद्य चतुर्थी) अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगासह आलेली असल्याने भाविकांनी दर्शन, पूजा अभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बरेच भाविक सोमवार, दि. 4 मे रोजीच रात्री उशिरापर्यंत श्री मंगळग्रह मंदिरात दर्शन, पूजा अभिषेकासाठी दाखल झाले होते.
आज पहाटे 5.25 वाजेपासूनच चतुर्थीचा प्रारंभ होणार असल्याने श्री मंगळग्रह मंदिरात फुलांची आकर्षकरित्या सजावट करण्यात आलेली होती. त्यात या मुहूर्तावर श्री मंगळग्रह देवासह प्रारंभी पहाटे पाचच्या सुमारास श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमानजी आणि श्री मंगळग्रह देवता यांचे यजमानांच्या शुभ हस्ते विधिवत विशेष पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी मंदिर परिसरातील भगवान श्री गुरुदत्त भगवान-श्री अनघालक्ष्मी माता तसेच श्री कालभैरवनाथ-श्री माता भैरवी यांचे तसेच श्री स्वामी समर्थ महाराज व मंगळेश्वर महादेवांचेही दर्शन घेतले. ही चतुर्थी बुधवार, दि. 6 मे 2026 रोजी सकाळी 7.51 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे ही अंगारकी अहोरात्र आहे. या दिवशी शिवयोग आणि बुधादित्य योग जुळून आलेले असल्याने हा दिवस भाविकांसाठी अधिक फलदायी मानला गेला. या दिवशी उपवास केल्याने वर्षभरातील सर्व (21) संकष्टी चतुर्थींचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजच्या दिवशी रात्री चंद्रोदयाची वेळ 10.35 च्या सुमारास होती. त्यामुळे अनेक भाविकांनी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडल्याचे पाहावयास मिळाले.
काय आहे अंगारकी चतुर्थीचे महत्त्व
स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला, की मंगळवारी येणारी चतुर्थी ‘अंगारकी’ नावाने ओळखली जाईल. या दिवशी उपवासाचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते, आत्मविश्वासात वाढ होऊन रखडलेली कामे मार्गी लागून संकटे दूर होतात. या दिवशी पहाटे स्नान करून उपवास व्रताचा संकल्प करावा. दिवसभर फलाहार किंवा निर्जळी उपवास ठेवावा. गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य समर्पित करावा. रात्री चंद्र दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून आणि गणपती बाप्पांची आरती करून उपवास सोडावा.
यंदा तीन अंगारक चतुर्थी
यंदा योगायोगाने तीन अंगारक चतुर्थी आहेत. पहिली 6 जानेवारी रोजी झाली. त्यानंतर दुसरी 5 मे रोजी झाली, तर तिसरी 29 सप्टेंबर 2026 रोजी येणार आहे. यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी तीन असण्याचे मुख्य कारण पंचांगानुसार ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती आणि मंगळवार व चतुर्थी तिथीचा योगायोग हे आहे.




















