जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा मोठ्या अटी तटीवर पार पडली महाविकास आघाडीचा सुपडा साफ तर महायुतीला मोठे यश आले या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड मधील प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की, ‘बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’ असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.
विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना झाला होता. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यभरात 41 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी सांगितलेला दावा त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. रोहित पवार यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली. मात्र अजित पवार यांनी अद्याप रोहित पवार यांना जशाच तसे उत्तर दिलेले पाहायला मिळाले नव्हते. मात्र, आता अजित पवार यांनी भेट झाल्यानंतर रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवार यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विजय झाला असला तरी त्यांच्यासाठी हा निसटता विजय म्हणावा लागेल. अगदी थोड्याफरकाने रोहित पवार हे विजयी झाले आहेत. त्यातच अजित पवार यांनी आता माझी सभा झाली असती तर… असे म्हणत रोहित पवार यांना इशारा दिला आहे.