जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने जळगाव शहरातील शालेयस्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत शहरातील २२ शाळांमधील इ.८वी, इ.९वी, इ.१०वीच्या एकूण ५९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच ५० संघ व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते. सकाळच्या प्रथम सत्रात के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले यांच्या शुभहस्ते यज्ञ प्रज्वलित करीत शंखनाद व मंत्रोच्चारात स्पर्धेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. आपल्या मनोगतातून ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार,प्रसार व विकासासाठी अशा स्पर्धांची नितांत गरज असल्याचे सांगत अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे प्रतिष्ठानच्या वतीने माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शहरस्तरीय गीता पठण स्पर्धा आयोजित केली जाते असे प्रतिपादन केले. तसेच श्री आद्य शंकराचार्य यांचे स्पर्धेला दिलेले नाव अत्यंत समर्पक असल्याचे विशद केले. द्वितीय सत्रात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अत्यंत उत्साहात स्तोत्र पठण करीत संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. इ.८वीच्या गटातून या श्रीमती एस.एल.चौधरी शाळेने प्रथम तर ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय आणि नंदिनीबाई मुलींचे विद्यालयाने तृतीय क्रमांक तर अ.वा.अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल व ओरियन सी.बी.एस.ई.स्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. इ. ९वीच्या गटातून ओरियन सी. बी.एस.ई. स्कूल प्रथम, प.न.लुंकड द्वितीय,न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल तृतीय,तर नंदिनीबाई मुलींचे विद्यालय व अ.वा.अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले. इ.१०वीच्या गटातून ब.गो.शानबाग विद्यालय प्रथम,ओरियन सी.बी.एस.ई.द्वितीय, प.न.लुंकड तृतीय, सु.ज.वाणी भगीरथ स्कूल, व नंदिनीबाई मुलींचे विद्यालय यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. केतकी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सदर स्पर्धेच्या विजेत्या प्रत्येक गटाला/ वर्गाला प्रथम बक्षीस ७०१₹, द्वितीय बक्षीस ५०१₹, तृतीय बक्षीस ३०१₹, व उत्तेजनार्थ क्रमांकाचे प्रत्येकी २०१₹चे बक्षिस, स्वामी विवेकानंद यांची सुबक, आकर्षक मूर्ती व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. प्रा.डॉ. भाग्यश्री भलवतकर, प्रा.डॉ अखिलेश शर्मा, प्रा.कपिल शिंगाणे, प्रा.मयुरी हरिमकर, प्रा.प्रीती शुक्ल, प्रा.सुप्रिया देशपांडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांनी भूषविले. यावेळी मंचावर पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे व प्रा.उमेश पाटील, संस्कृत शिक्षक प्रा.अर्जुनशास्त्री मेटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश सूर्यवंशी व आभार प्रदर्शन प्रा.आर. बी.ठाकरे तर बक्षिसांचे वाचन प्रा.सौ. छाया चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.