जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३
राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या सत्कार कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष यदु जोशी, दैनिक पुढारीचे पत्रकार उदय तानपाठक, दिलीप सपाटे, नवशक्तीचे संपादक संजय मलमे, नवाकाळच्या नेहा पुरव, आयबीएन लोकमत गडचिरोलीचे महेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. यदु जोशी आणि सदस्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांची निवृत्तीवेतनवाढ, निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्यसुविधा, बैठकांसाठी मानधन, प्रवासभत्तावाढ आदी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पत्रकारांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, अर्थ विभागाचे त्याला सहकार्य असेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार व राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांना दिले.