जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे सत्ताधारी व विरोधक रोजच एकमेकाविरोधात टीकास्त्र करीत असतांना नुकतेच नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह इतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांनी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, तुमच्या योजनांबद्दल चूकीचा प्रचार करणाऱ्या, वेळप्रसंगी योजना बंद पाडण्यासाठी डाव रचणाऱ्या राज्यातील काही सावत्र भावांपासून महिलांनी सावध होण्याची गरज आहे. महायुतीची ताकद वाढवा. वेळप्रसंगी तुमच्या योजनांवर पाणी फेरणाऱ्या सावत्र भावांपासून सावध होऊन त्यांना जोडा दाखविण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मी गरीबी पाहिलेली आहे, सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलेलो नाही. दीड हजाराची किंमत आम्हालाच कळते, याची धग काय आहे, याची गरज आहे. हे पुढे बसलेल्या बहिणींशिवाय दुसऱ्यांना काय कळणार, पैसे आले तर त्यातून अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना आहे. अर्थव्यवस्था वाढवणारी व चालवणारी ही महिलाशिवाय दुसऱ्याशिवाय कोणालाही जमणार नाही. ही योजना सर्व रेकॉर्ड मोडले. ही योजना एवढी लोकप्रिय झाली की, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
हे सरकार आपण सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो. मग शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर हे भूषणावह नाही. त्यामुळे मुलींना उच्च शिक्षणासाठी फी माफी केली. सावत्र भावांपासून सावध रहा, योग्यवेळी त्यांना जोडा दाखवण्याचे काम करा. इकडे विरोध करायचा अन् दुसरीकडे फलक लावून योजनेच्या नावाखाली श्रेय घ्यायचे, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.