
जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५
भुसावळ तालूक्यातील वरणगाव येथे एका मिरवणुकीत डीजेवर लावलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे दगडफेक होऊन आठ महिलांसह नऊ जण जखमी झाले. या प्रकरणी १५ जणांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता वरणगावातील सिद्धेश्वर नगरात मिरवणूक काढण्यात आली. त्यात डीजे ऑपरेटर आकाश निमकर यास कोणते गाणे लावावे, यावरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यामुळे वाद होऊन दगडफेक झाली. यात फिर्यादी आशाबाई बिन्हाडे, अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडु जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी वाघ, आशिष भालेराव, सोनू भालेराव हे जखमी झाले. तसेच इतर महिलांना कृष्णा माळी याने काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी संशयित नीलेश काळे, नीलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत व अज्ञात दहा जण अशा १५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी नागरिकांनी स्त्रियांसह वरणगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रांत जितेंद्र पाटील यांनी मोबाईल स्पीकरवर नीलेश काळे यास जिल्हा हद्दपार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.