
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या सुरू असलेले वाद निरर्थक असून अशा मुद्द्यांवरून समाजात तणाव निर्माण करणे असंवेदनशील कृत्य असल्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सन्मान अतुलनीय असून त्यांचा अवमान कोणीही करू शकत नाही, असे सांगत फडणवीस म्हणाले, शिवाजी कोण होता ? हे पुस्तक 1979 साली लिहिले गेले आहे. आज त्यावरून वाद उकरून काढणे आणि दोन्ही बाजूंनी संघर्ष निर्माण करणे हे शुद्ध असामाजिक आहे.”
दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सध्या राज्यात मोठा वाद सुरू आहे. बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकातील उल्लेखावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आंबी यांनी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसह मोर्चा काढत पुस्तकाचे सार्वजनिक वाचन केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काहींना ताब्यात घेतले. या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, “आक्षेप घेणाऱ्यांनी पुस्तक वाचले आहे की नाही, तसेच आंदोलन करणाऱ्यांना मुद्द्याची माहिती आहे की नाही, याबाबत शंका आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी वाद निर्माण करणे योग्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.






















