जळगाव मिरर | २४ जुलै २०२५
शहरातील एका वाहनाच्या शो-रुममध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणी बसने घरी जाण्यासाठी निघाले. हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा काही तरुणांना संशय आल्याने त्यांनी बसचा पाठलाग करीत कालिंका माता चौकात बस थांबवत दोघांना खाली उतरवले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्या तरुणीची तक्रार नसल्यामुळे त्याचे जबाब नोंदवून तरुणीला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथे राहणारे तरुण-तरुणी शहरातील वेगवेगळ्या वाहनांच्या शो-रुममध्ये कामाला आहे. दररोज ते दोघे एकाच बसमधून प्रवास करीत असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली होती. नेहमीप्रमाणे सुट्टी झाल्यानंतर ते दोघांनी सोबत नाश्ता केला आणि ते बसने घरी जाण्यासाठी निघाले. काही तरुणांना हा प्रकार लव्ह जिदाद असल्याचा संशय आल्याने त्या तरुणांनी बसचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ही बस शहराच्या बाहेर पडत असतांना कालिंका माता चौकात काही तरुणांनी बस अडवून त्या दोघ तरुण-तरुणीला खाली उतरवले. अचानक बस थांबवून तरुण दोघांना बसच्या खाली उतरवत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ, एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठचे प्रभारी सपोनि साजीद मन्सूरी यांनी कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले.
त्या दोघांना शनिपेठ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर याठिकाणी देखील तरुणाचा मोठा जमाव जमला होता. दरम्यान, तरुणीने काही महिन्यापुर्वीच त्या तरुणासोबत आपली ओळख झाली असून ते दोघ दररोज एकाच बसने प्रवास करीत असल्याने त्यांच्यात मैत्री झाल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच तीने तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्या दोघांचे जबाब नोंदवून तरुणीला तिच्या परिवाराच्या स्वाधीन केले.




















