
जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२४
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. या प्रकरणावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
“सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हे महाराष्ट्र विकून काढतील तरी कारवाई होणार नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आज माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
“चित्रा ताई म्हणाल्या, मंत्री करु नये, तरी संजय राठोडांना मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही, लगेच काढून टाकलं आणि इकडे प्रेम करणारी असूदे प्रेम करून मारहाणही करता तुमची परवानगी असेल तर दहा दहा बायका करा पण कोणाचा खून करू नका,” असे वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर यांचे नाव न घेता निशाणा साधला.