
जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
मालट्रक व खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर २६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर भटुंबरे (ता. पंढरपूर) येथील खेडलेकर मठाजवळ रविवारी पहाटे ६.१० वाजता घडला. बेगाबाई सोपान म्हाळसकर (६५) आणि जान्हवी ऊर्फ धनू विठ्ठल म्हाळसकर (११, दोघी रा. नाने मावळ, ता. मावळ, जि. पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात व सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे मिनी बस ही नाने मावळ (ता. मावळ) येथून विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना घेऊन टेंभुर्णी मार्गे पंढरपूरकडे येत होती. भटुंबरे येथील खेडलेकर मठाजवळ मिनी बस चालकाने टेंभुर्णीकडे निघालेल्या मालट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात मिनी बसमधील गंभीर जखमी झालेल्या बेगाबाई सोपान म्हाळसकर आणि जान्हवी ऊर्फ धनू विठ्ठल म्हाळसकर यांचा मृत्यू झाला, तर इतर २६ जण जखमी झाले. यामध्ये मिनी बसचालक गणेश बबन होटकर (रा. कांबी, ता.शेवगांव, जि. अहिल्यानगर), प्रांजल म्हाळसकर (१२), विशाल म्हाळसकर (४०), भामाबाई म्हाळसकर (सर्व रा. नाने मावळ, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यासह इतर २३ जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात तसेच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.