जळगाव मिरर | ३० जून २०२३
राज्यातील समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अद्याप कमी होत असतांना दिसत नाही आहे. कोपरगावनजीक समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. समृध्दी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठान शिवारात उभ्या असलेल्या आयशर वाहनाचा क्रुझर गाडीने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती दीद महिन्यांच्या मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे.
आयशर-क्रुझरच्या अपघातानंतर क्रुझरमधील संतोष अशोक राठोड वय ३० , अवनी संतोष राठोड वय १८ महिने या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी असलेल्या वर्षा संतोष राठोड वय २७ यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हे तिघेही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. आयशरला क्रुझरने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. यात क्रुझरचा पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. गाडीची अवस्था इतकी भीषण आहे की खिडकीच्या काचादेखील फुटल्या आहेत. अपघातात क्रूझरमधील सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर, एका कुटुंबाचा दुर्देवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील चांदणी चौकातही भीषण अपघात घडला आहे. स्टेरिंगचे रॉड तुटल्याने चांदणी चौकात टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाल्याने अपघात घडला आहे. कर्वेनगरकडून हिंजवडीला जाताना टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. यावेळी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार प्रवासी होते. मात्र, या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाहीये. आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अपघात झाला. पावसाची संततधार सुरू असल्यामुळं आधीच पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यातच आज झालेल्या अपघातामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.