जळगाव मिरर | ६ जुलै २०२३
जळगाव शहरातून चोपडा येथे जाणाऱ्या चोपडा आगाराच्या बसचा बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता ममुराबाद रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप काढण्यात आले. चोपडा आगाराची (क्र. एमएच २० बीएल २५३८) बस बस छत्रपती संभाजीनगरहून चोपड्याकडे येत होती. या बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते.
जळगावहून निघाल्यानंतर ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला गेली. मात्र, त्याठिकाणी चिखल असल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली, त्यात बस काही प्रमाणात उलटली. बसचा दरवाजा खाली दाबला गेल्यामुळे आपत्कालीन दरवाजा उघडून त्यातून ममुराबाद ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. चालक के.एस. भोई व वाहक के.एम. चव्हाण यांनाही सुदैवाने कोणत्याही जखमा झाल्या नाहीत.