नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संघर्ष करीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.
केंद्रीय कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखेबाबत विचारमंथन होणार आहे. बैठकीनंतर तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील समोर आली होती. दरम्यान सोनिया गांधी व्हर्च्युअली उपस्थित राहून या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेश दौऱ्यावर असून राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत आहेत. सूत्रांनी सांगितले की, रविवारी होणाऱ्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीचा अजेंडा केवळ काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी आहे, परंतु गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावरही चर्चा होऊ शकते अशी माहिती समोर आली होती.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. काँग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, या वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. CWC ने निर्णय घेतला होता की 16 एप्रिल ते 31 मे या कालावधीत ब्लॉक समित्या आणि राज्य कॉंग्रेस युनिट्सच्या एका सदस्यासाठी निवडणुका घेण्यात येतील. यानंतर 1 जून ते 20 जुलै या कालावधीत जिल्हा समिती प्रमुखांची निवडणूक होणार असून, 21 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत राज्यप्रमुख आणि एआयसीसी सदस्यांची निवड होणार आहे. त्याच वेळी, AICC अध्यक्षपदाची निवडणूक 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.