जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
जळगाव शहरातील एका महाविद्यालय परिसरात आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता पिडीत मुलगी ही महाविद्यालय परिसरात कामानिमित्त आलेली असतांना पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. सायंकाळ पर्यंत पिडीत मुलगी ही घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी रविवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.