जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली होती. हि योजना सुरु असताना आता राज्याचे माजी मंत्री व अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केल्याने सर्वच लाडक्या बहिणी नाराज झाल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे.
नियमात बसत नाहीत अशा लाडक्या बहीणींनी अर्ज काढून घ्यावेत, अन्यथा सरकारने दंडासह वसूली करावी, नाशिकमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर केला गेल्याचे म्हंटले आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झाला आहे. काही प्रमाणात हे खरे असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी आता वेगळे नियम केले आहेत. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही, मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही, ते आता मागण्यात येवू नये. मागे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण, मात्र याच्यापुढे लोकांना सांगावे, जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे. अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांचा सल्ला घ्यावा असे मला वाटत नसल्याचे म्हणत टोला लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, पक्षाने मला आदेश दिला आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. खाली आपण कोणतेही भाषी करू नये. त्यामुळे मी त्या संदर्भात काही स्टेटमेंट करू इच्छित नाही. हा विषय संपला आहे. माझे विरुद्ध कोणी काही बोलले नाही तर मीही कोणाविषयी बोलणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, शेगाव येथे माली समाजाच्या मेळाव्यात देखील छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जातिनिहाय जनगणनेची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. मात्र आमची वेळोवेळी फसवणूक झालेली आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र ते आमच्यात आले तर आम्हालाही काही मिळणार नाही आणि त्यांनाही काही मिळणार नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करा नाहीतर आम्हाला 51 टक्के घोषित करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अशा कार्यक्रमाला जाणे मी टाळतो. कारण समाज एक असला तरी पक्ष वेगळे असतात, विचारसरणी वेगळी असते. मी ओबीसींच्या प्रश्नावर शिवसेना सोडली. मी नरसिंह राव यांच्याकडे गेलो. त्यावेळी नरसिंह राव यांनी ओबीसी समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातूनच समता परिषद स्थापन झाली. आदिवासी, दलित, ओपन आणि ओबीसी या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधले व्ही पी सिंहानी नंतर मंडळ आयोगासाठी काम केले. त्यानंतर आपल्याला 30 टक्के आरक्षण मिळाले.