जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात जात सभा घेवून समाजाला एकत्र केले आहे. तर दुसरीकडे सरकारला दिलेली वेळ देखील संपली असून सरकार कुठलाही निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे पाटलांनी आता निर्णय घेतला आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा केली आहे. मराठा समाजाची पायी दिंडी 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघेल. त्यानंतर ती मजल दरमजल करत अहमदनगर – पुणेमार्गे मुंबईला पोहोचेल, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह मुंबईतील आझाद मैदानावर 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाची रुपरेषा त्यांनी गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला जाहीर केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाची पायी दिंडी 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघेल. त्यानंतर ती मजल दरमजल करत अहमदनगर – पुणेमार्गे मुंबईला पोहोचेल.
असा असेल मार्ग
मराठा समाजाची पायी दिंडी जालन्याच्या आंतरवाली सराटीहून शहागड, गेवराई (बीड), पाडळ शिंगी, तांदळा, मातुरी, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव, सुपार, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपासहून चंदननगर मार्गे शिवाजीनगर पुण्याला पोहोचेल. त्यानंतर तेथून पुढे ती पुणे – मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी चेंबूरमार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचेल, असे मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. दिंडीच्या मार्गात येणाऱ्या सर्वच गावांतील मराठा समाज आपापल्या भागातील दिंडीत सहभागी होतील. या सर्व नियोजनाची पीडीएफ कॉपी तयार करून व्हॉट्सएपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पाठवली जाईल, असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
मनोज जरांगे यांनी यावेळी आंदोलकांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. दिंडी शांततेत मुंबईच्या दिशेने जाईल. त्यामुळे कुणीही फोटो काढण्यासाठी गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी आपापल्या तुकडीतच रहावे. प्रत्येक गाडीत 2 समन्वयक असतील. या प्रकरणी कोणत्याही मराठा बांधवांनी गटतट करू नये, असे ते म्हणाले.