जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या असतांना नुकतेच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील त्याच बदलापूर मध्ये पोलिसांनी मंगळवारी एका 55 वर्षीय व्यक्तीला आपल्या 16 वर्षीय मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीची आई जेव्हा कामादरम्यान रात्रीच्या शिफ्टला जात होती, तेव्हा आरोपी मुलीला टार्गेट करत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर मधीलच एका पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला याबाबत कोणाला सांगू नकोस, अशी धमकी देऊन मुलीला मारहाण देखील केली होती. या सर्व प्रकारानंतर 22 ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या घरातून पळून गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा आईला या सर्व घटनांची माहिती दिली. या प्रकरणी सोमवारी तक्रार दाखल केल्यानंतर बदलापूर पोलिसांनी आरोपी पित्याला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार अटक केली आहे.