जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघाताची ताजी घटना असताना नुकतेच सोमवारी आज दि.२३ रोजी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात परतवाडा-धारणी मार्गावर खासगी कंपनीची बस पुलावरून कोसळून भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान परतवाडा येथून धारणीच्या दिशेने नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन एक खासगी बस जात होती. यावेळी एका अरुंद पुलाच्या मार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे बस पुलावरून खाली कोसळली. बस उंचावरून कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.
यातील तीन प्रवासी गंभीर आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथून गंभीर असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले. या घटनेची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सबंधित बस ही चावला कंपनीची असल्याची माहिती आहे.