जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२४
मी माझ्या पोटाच्या विकारामुळे तसेच सततच्या आजारीपणामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. अशी सूसाईट नोट लिहून शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील एका खासगी क्लासचे शिक्षक राहुल आंबादास पाटील (वय ३५, रा. बोरखेडा, ता.धरणगाव, ह.मु.गुजराल पेट्रोलपंप मागे) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी राहुल पाटील हे पत्नी व आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ वास्तव्याला होते. ते त्यांच्या काकांच्या खासगी क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजारामुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या पोटाची दोनवेळा शास्त्रक्रिया देखील झालेली आहे. याच पोटाच्या आजाराला कंटाळून राहुल पाटील यांनी घरात कुणीही नसतांना दुपारच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
राहुल पाटील यांची पत्नी घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडताच त्यांना, पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पतीला बघताच त्यांनी हंबरडा फोडला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ राहुल पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपुर्वी राहूल पाटील यांनी सूसाईट नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी मी राहूल पाटील असे लिहून देतो की, मी माझ्या पोटाच्या विकारामुळे तसेच सततच्या आजारपणामुळे हे पाऊल उचलत आहे. माझा या गोष्टीला कोणीही जबाबदार नसेल. सॉरी फॉर ऑल ऑफ यू…., माझ्या आत्महत्ये मागे क्लासचा कुठेही संबंध नाही, त्यामुळे त्यांची बदनामी कोणीही करु नये ही विनंती. या आशयाची सुसाईट नोट पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे.
राहूल पाटील हे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यां शिकवित होते. गुरुवारी दुपारी दोन ते ते तीन या वेळेत त्यांनी विद्यार्थ्यांचे एक्सट्रा क्लास देखील घेतला. त्यानंतर राहुल पाटील हे अकॅडमीच्यावर असलेल्या राहत्या घरी गेले आणि त्याठिकाणी त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.