जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३
छत्रपती संभाजी नगरातील बजाजनगरात ७ वर्षीय समर्थ शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळता खेळता एका खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी ९ वर्षीय बहीण चैतालीने पाण्याने भरलेल्या डबक्यात उडी मारली. मात्र दुर्देवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हि घटना दि. १५ डिसेंबर रोजी घडली आहे. अवैध मुरूम उत्खननामुळे निर्माण झालेल्या या खड्ड्यांनी चिमुकल्या बहीण-भावाचा बळी घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगरातील भाड्याच्या घरात विद्या राहुल देशमुख ही महिला समर्थ व चैताली या दोन मुलांसह वास्तव्यास असून एका कंपनीत काम करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांची मुलगी चौताली स्वामी विवेकानंद शाळेत चौथीत तर मुलगा समर्थ दुसरीत शिकत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही दोन्ही भावंडे शाळेतून आली. काही वेळाने खेळण्यासाठी जवळच असलेल्या मोकळ्या मैदानावर दोघेही गेले. या मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरूम उत्खनन करण्यात आल्यामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी त्यात अजूनही साचलेले अाहे.
खेळण्याच्या नादात असलेला समर्थ खड्ड्यात पडला. चैतालीने ते पाहिले. क्षणाचाही विचार न करता भावाला वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली. हा प्रकार बघून तेथे खेळत असलेल्या राजवीर साबर या त्याच्या मित्राने आरडाओरड केली. मात्र कुणीही मदतीला येऊ शकले नाही. तेथून जवळच असलेल्या मैदानावर विशाल मोरे, गणेश खांडेकर हे तरुण पोलिस भरतीच्या तयारीचा सराव करत होते. राजवीरने त्यांच्याकडे धाव घेऊन हा प्रकार सांगितल. या तरुणांनी तातडीने धाव घेतली व खड्ड्यात उडी मारून चैताली व समर्थला पाण्यातून बाहेर काढले. नाकातोंडात पाणी गेल्याने दोन्ही भावंडे बेशुद्ध झाली होती. पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.