जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
मित्रांसोबत शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या महेंद्र नारायण पाटील (वय २५, रा. लोणवाडी, ता. जळगाव) या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहरीतील पाणी उपसले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तरुणाचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील महेंद्र पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवार दि. २९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत लोणवाडी गावातील शेतामध्ये विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र विहरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने सुमारे ७० फुट खोल असलेल्या विहिरीत तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोहेकों प्रदीप पाटील व स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास महेंद्रचा मृतदेह मिळून आला.
मृतदेह विहरीतून बाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. यापक्ररणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.