जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
बुलढाणा येथून एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. बुलढाणा-खामगाव रोडवर दुचाकीला अनोळखी वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील सासू, सासरे अन् सुनेचा दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा खामगाव रोडवरील भादोलाजवळील पोखरी फाट्यावर दुचाकीला एका अनोळखी वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांना चिरडल्याने भयंकर अपघात घडला आहे.
या दुर्घटनेत दुचाकीवरील सासू सासरे अन् सुनेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील सहा वर्षांच्या मुलाचा जीव वाचला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.