जळगाव मिरर / १२ मार्च २०२३ ।
एका विवाहित महिलेला प्रेमजाळयात ओढून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने त्या क्षणाचा व्हिडिओ बनवून तो इंटरनेटवर व्हायरल केल्याची घटना अमरावती येथे घडली आहे. ही बाब कळताच विवाहितेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरूध्द तक्रार नोंदविली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ११ मार्च रोजी रात्री ८.३४ मिनिटांनी आरोपी किरण काशिनाथ गजभिये (२९, जळू) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी व ३६ वर्षीय पिडिता हे परस्परांचे ओळखीचे होते. त्यातून त्यांच्यात परिचय व संवाद देखील होता. तो तिच्या घरी येजा करायचा. अशातच, जानेवारी २०२० मध्ये त्याने ‘वहिनी, तुम्ही मला खुप आवडता, अशी गुगली फेकली. विवाहितेचा पती हा मद्यपी असल्याने ती देखील आरोपीकडे आकर्षित झाली होती. त्याचदरम्यान आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या क्षणाचा त्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. ते समजताच तो व्हिडिओ डिलिट करण्याची विनंती पिडिताने त्याला केली. मात्र, तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्याआड तिचे अनेकदा सर्वस्व लुटले.
आरोपीने त्याच्याकडे असलेल्या व्हिडिओची धमकी देऊन विवाहितेशी वारंवार बळजबरी केली. मात्र अलिकडे त्याने तो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यासोबतच इंटरनेटवर अपलोड करून व्हायरल केला. काही परिचयातील व्यक्तींनी तो प्रकार पिडिताच्या लक्षात आणून दिला. त्या सोशल व्हायरलमुळे पिडिताची सामाजिक बदनामी झाली. त्यामुळे ११ मार्च रोजी रात्री तिने लोणी पोलीस ठाणे गाठले.