जळगाव मिरर | २९ जुलै २०२३
जळगाव शहरात दुचाकी चोरीसह घरफोडीच्या घटना गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याने शहरात चोरीच्या घटना सुरूच आहे. शहरातील प्रेम नगर परिसरातील ५८ वर्षीय महिला आपल्या मुलीच्या घरी झोपण्यासाठी गेलेल्या असतांना त्यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना २८ रोजी सकाळी साडे आठ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध २८ रोजी गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेम नगर परिसरातील रहिवासी असलेल्या प्रतिभा सुभाष बडगुजर (५८, रा. प्रेमनगर ) हे आपल्या मुलासह रहायला असून याच परिसरात त्यांची मुलगी राहते. गुरुवारी रात्री त्या मुलीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून त्यांच्या घरातून चांदीचे ताबे, फुलपात्र, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, चांदीचा आकडा असा एकूण ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी सकाळी प्रतिभा बडगुजर घरी आल्या त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार गुलाब सैंदाणे हे करीत आहेत.