
जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४
गावी घराचे काम सुरू असल्याने तेथे गेलेल्या आकाश अनिल पाटील (वय २८, रा. रायसोनी नगर) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ६० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगरात आकाश पाटील हे वास्तव्यास आहेत. जळगाव तालुक्यातील वडली येथे घराचे काम सुरू असल्याने ते तेथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख १० हजार ५०० रुपयांसह दोन तोळे सोन्याचे पोत, अंगठी व चांदीची देवीची मूर्ती असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना दि. ७ रोजी शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी आकाश पाटील यांना माहिती दिली. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.