जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
गोडावूनच पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्याठिकाणावरील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या चावीने तिजोरी उघडून त्यामध्ये ठेवलेली १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना एमआयडीसीतील ईस्टाकार्ड सर्विसेस प्रा. लि. या कंपनीच्या गोडावूनमध्ये दि. १ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एसएमआयटी महाविद्यालया परिसरातील म्हाडा कॉलनीत पवन किशोर गाडीलोहार हे वास्तव्यास असून ते एमआयडीसी परिसरातील इंस्टाकार्ड सर्विसेस प्रा. लि. कंपनीमध्ये नोकरीस आहे. या कंपनीचे एमआयडीसीतील अजिंठा रोडवर प्लॉटनंबर जी २/७ मध्ये गोडावून आहे. दि. १ रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील सर्वजण काम आटोपून घरी निघून गेले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडावूनचा पत्रा कापून ते आतमध्ये शिरले. चोरट्यांनी ड्रावरमध्ये ठेवलेल्या चावीने तेथील तिजोरी उघडून त्यात असलेली १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरुन नेली. दि. २ रोजी नेहमीप्रमाणे पवन गाडीलोहार हे कंपनीत आले असता, त्यांना तिजोरी उघडी असल्याचे दिसून आली.
कंपनीत चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर पवन गाडीलोहार यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोहे कॉ दत्तात्रय निकम हे करीत आहे.