जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
अमळनेर येथील पातोंडा येथे अंगणातून रिक्षा गेली म्हणून तिघांनी एकाच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. तसेच त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येथे घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा येथील शांताराम भालेराव पाटील हे १२ रोजी सायंकाळी त्यांची रिक्षा मधुकर राजराम पाटील यांच्या अंगणातून नेत असताना मधुकर पाटील यांनी अंगणात टाकलेल्या मातीच्या वरमावरून गेल्याने मधुकर पाटील त्यास शिवीगाळ करू लागले. लगेच सिंधुबाई राजाराम पाटील या ही बाहेर आल्या व त्यांनीही शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. तर शांताराम पाटील यांच्या पत्नी वर्षा या भांडण सोडवायला गेल्या असता त्यांनाही त्यांनी मारहाण केली. लगेच भोलू मधुकर पाटील याने शांताराम पाटील यांच्या डोक्यात वीट मारली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळ्याला पाठवण्यात आले होते. रुग्णालयातून परत आल्यावर शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात मधुकर पाटील, सिंधुबाई पाटील, भोलू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करत आहेत.