
जिल्ह्यातील धोबी समाजातील कुस्ती व कबड्डी खेळातील पहिले राष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान मिळविणारे सामांन्यातील असामान्य व्यक्तिमत्व स्व. रमेशआप्पा वाघ यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त विशेष लेख.
क्रीडाक्षेत्रात आप्पा या नावाने प्रसिद्ध असलेले आप्पा केंद्र सरकारच्या आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्टरी) सेवेत होते. नोकरी सांभाळून क्रीडा महर्षी स्व.बबनभाऊ बाहेती यांच्या तालमीत कुस्ती व कबड्डी खेळाच्या अतोनात प्रेमापोटी खेळात व सरावात सातत्य टिकवत राष्ट्रीयस्तरावर खेळात धडक मारली एवढे मोठे खेळाडू असून कधी कोणताच बडेजाव केला नाही की गर्व कधी शिवला नाही गावस्तरापासून राज्य,राष्ट्रीय, विद्यापीठ, विविध शासकीय विभागाच्या कुस्ती स्पर्धेला आप्पा नेहमी पंच म्हणून हमखास असत निःपक्षपातीपणाने कार्य करीत. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व खेळाडू त्यांच्याशी आदरानेच संवाद साधत असत कारण खोटेपणा वा लबाडी त्यांना चालत नसे वेळप्रसंगी कोणी चुकला तर तो कितीही मोठा खेळाडू, पदाधिकारी अथवा अधिकारी असो आप्पा त्यांना जागेवरच झापत असे यामुळे त्यांचे समोर कुणी चुकीचे वागतच नसे.त्यांनी असंख्य खेळाडू घडविले अनेकांना मार्गदर्शन केले. स्पर्धेदरम्यान फावल्या वेळेत किंवा निवांत वेळी घरी येऊन आप्पा तासनतास त्यांच्या कारकीर्द व खेळातील गमती जमती विषयी, स्पर्धेविषयी सांगत असत. जिल्ह्यात कुस्तीच्या किंवा कबड्डीच्या स्पर्धा कुठेही असो तिथे आप्पा हजर रहात असत एवढे प्रेम कुस्तीवर व कबड्डीवर होते त्यांच्या बरोबरीचे खेळाडूत त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती असे आज राज्यस्तरापर्यत खेळाडू पोहचला म्हणजे त्याला आकाश ठेंगणे वाटते पण आमचे आप्पा याला अपवाद होते चमकोगिरी आप्पानां संपूर्ण हयातीत आवडलीच नाही सामाजिक कार्यात देखील त्यांचा हिरारीने सहभाग असायचा प्रत्येक सामाजिक कार्यक्रमास त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. त्यांच्या रोखठोक बोलण्याने त्यांच्या मित्रमंडळीत व क्रीडाक्षेत्रात आप्पा सर्वांसाठी आदरयुक्त आदर्श होते. उमेदीच्या काळात नोकरी आधी मी खेळासाठी परिस्थिती कधीच आड येऊ दिली नाही परिस्थितीवर मात करीत खेळत राहिलो म्हणूनच इथपर्यत पोहचलो हे ते नेहमी सांगत. आजच्या पिढीला हे फारच सूचक आहे. एरंडोल येथे रोजी स्पर्धेसाठी स्वताच्या मोटारसायकल वर आप्पा गेले होते व रात्री परत येतांना ४ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांचा अपघात झाला कुटूंबाला व समाजालाच नाही तर जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला ते पोरके करून गेले त्यांच्या पवित्र स्मृती ते मागे ठेवून गेले. म्हणतात ना “जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला”. आप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृतीचा सुगंध त्यांच्या आठवणीने आपल्यात सतत दरवळत आहे. त्यांची मुले श्री.राहुल वाघ व श्री.मनोज वाघ हे क्रीडाक्षेत्राशी निगडित राहून त्यांचा वारसा चालवीत आहे.
माझे मोठे बंधू, मार्गदर्शक, हितचिंतक, दिशादर्शक, गुरुवर्य असलेले स्व.आप्पासाहेब यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली.
– राजेश जाधव
क्रीडा शिक्षक व राज्यशासनाचा जिल्हा संघटक पुरस्कार प्राप्त शिक्षक
जळगाव जिल्हा व महाराष्ट्र राज्य क्रीडा विविध संघटनेचे पदाधिकारी





















