जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण सुरु असतांना गेल्या चार दिवसापूर्वी तोरणमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पाय घसरून तोल गेल्याने मृत तरुण दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरूण पर्यटनासाठी आले होते. याच तरुणांत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोर पाणी येथील भरत पावरा याचाही समावेश होता. हा तरुण आपल्या मित्रांसोबत प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याचा परिसरात गेले होते. पण यावेळी त्याचे मित्र पुढे निघून गेले.या परिसरात दाट धुके होते. त्यामुळे भरत पावरा हा मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला.
सलग दोन दिवस परिसरात त्याच्या शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावद पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर खोल दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांना समजले. पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.