जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२४
जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात सोडलेल्या इलेक्ट्रीकचा शॉक लागून योगेश शिवाजी गायकवाड (वय ३०, रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले असता, त्यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक केली. यामध्ये पोलिस पाटीलांसह कर्मचारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील धर्मराज श्रावण पाटील यांनी गावाजवळ असलेल्या शेतात मक्याची पेरणी केली होती. रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी शेतातील पिकांचे नुकसान करीत असल्याने त्यांनी दि. १६ रोजी ईलेकट्रीक तारांद्वारे शेतात करंट सोडले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गावातील योगेश गायकवाड हा त्यांच्या शेतात गेला होता. यावेळी त्याला विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर योगेशचा मृतदेह पाचोरा येथे नेण्यात आला होता. घटनेनंतर रविवारी दत्तू शिवाजी गायकवाड यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार धर्मराज श्रावण पाटील यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित धर्मराज पाटील यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेत आढावा घेतला.