जळगाव मिरर | ३१ मे २०२३
अव्वल कारकून, मंडळाधिकारी, वाहनचालक व लिपिक संवर्गातील ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले.
या बदल्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रक्रिया सुरु होती. बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पसंतीचे दहा पर्याय मागविण्यात आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या बोलावून शिल्लक तालुका आणि पसंतीच्या क्रमाला प्राधान्य देत बदलीचे ठिकाण निश्चित करण्यात आले. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तहसीलदार पंकज लोखंडे, योगेश पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडली. दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेनंतर काही जणांना हातोहात बदल्यांचे आदेश देण्यात आले. बदल्यांचे आदेश हाती पडल्यावर काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंद तर काहींमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र दिसून आले. यात मंगळवारी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ९ अव्वल कारकून, १२ मंडळाधिकारी, ४ वाहनचालक व ६३ लिपिकांचा समावेश आहे.