जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात सध्या लग्नाची धामधूम सुरु असतांना एका हळदी समारंभ झाल्यानंतर जेवणाच्या पंगतीतून जाऊ न दिल्याने टोळक्याने राडा घालत नवरदेवावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जय भवानी चौक, श्रीनगर रहाटणी येथे दि.२२ शुक्रवारी रात्री घडली असून या प्रकरणी शनिवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राहुल तलवारे (वय २२, रा. काळेवाडी), सनी राजीव गायकवाड (वय २३, रा. पिंपरी), अनिकेत बापू बनसोडे (वय २४, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहित प्रकाश गायकवाड (वय २९, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित गायकवाड यांचा शुक्रवारी सायंकाळी हळदी समारंभ होता. हळदी समारंभ झाल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करण्यासाठी बसले त्यावेळी तिघेजण पंगतीमधून सतत ये जा करीत होते. त्यामुळे रोहित यांनी त्या तिघांना पंगतीमधून ये जा करण्यास मनाई केली. यातून वाद झाल्याने आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.
त्यांनतर काही वेळाने आरोपी कोयता आणि रॉड घेऊन आले. विजय तलवारे याने रोहित यांचा मामे भाऊ शक्ती बनसोडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित यांनी शक्ती यांना ढकलले. दरम्यान कोयत्याचा वार रोहित यांच्या हातावर झाला. रोहित या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी कोयता आणि रॉड हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट काढीन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच, तपासचक्रे फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरू आहे.