जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच कोल्हापूर शहरातील संभाजी नगर परिसरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी या घटनेला कोणाला जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आपले जीवन संपविले. हे दोघेही अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचे अडीच महिन्यांपूर्वी मे महिन्यात निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही नैराश्येत होते. त्यांच्याकडे चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आम्ही टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.