जळगाव मिरर । २६ जून २०२३
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात दि. 23 रोजी रात्री तरूणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चक्रे फिरवित दोन संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांभोरी गावातील शनिपेठ परिसरातील रहिवासी असलेला आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय 22) या तरूणाचा खून विवाहितेची छेडखानी करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (40, बांभोरी, ता.धरणगाव) यास उस्मानाबाद येथून अटक केली आहे. दरम्यान, संशयितासोबत मंडळाधिकारीदेखील असल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नाही. संशयित नन्नवरे यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
23 जून शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आशिष हा गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला असता त्याचा धारदार शस्त्र डोक्यात मारून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मयत आशिष हा गावातील विवाहितेची छेडखानी करीत होता व हा प्रकार विवाहितेच्या पतीने पाहिल्यानंतर त्याने पाळत ठेवून आशिषची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यासे उस्मानाबाद येथून अटक करण्यात आली. त्यानुसार एलसीबीचे पथकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन संशयित छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय 40, रा. बांभोरी ता. धरणगाव) व त्याचे सोबत असणारे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील (वय 34, रा. कल्याणी नगर, दादावाडी परिसर, जळगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांना धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. संशयित अमोल पाटील याच्यासोबत मंडळ अधिकारी देखील असल्याने त्यांना चोकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग अद्याप स्पष्ट झाला नसल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले करीत आहेत.